आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा (जन्म : २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा, बीड मृत्यू : १८ जानेवारी, इ.स. १९६५ रुबी हॉल क्लिनिक, पुणे) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आहेत.
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ ,तेलंगना,आंध्रप्रदेश,कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.
भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वंजारी जातीत जन्मले होते. त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि वडिलांचे नाव तुबाजीराव सानप असे होते. तुबाजीराव सानप यांच्या घरात पाटीलकी होती, म्हणून ते आडनावाच्या पाठीमागे पाटील असे उपनाम लावीत. घराण्यात अनेक पिढ्यांपासून विठ्ठलभक्ती आणि पंढरपूरची वारी होती. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील शिकरडीपारडी होय; पण त्यांचे पूर्वज बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव या गावी स्थायिक झाले होते.
No comments:
Post a Comment